ढाका, 28 जुलै :
बांगलादेशातील ढाक्यात नुकत्याच झालेल्या विमान अपघातानंतर मदतीसाठी धावलेल्या भारत, चीन आणि सिंगापूरच्या वैद्यकीय पथकांचे बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी विशेष आभार मानले आहेत.
जमुना येथील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये रविवारी (२७ जुलै) झालेल्या बैठकीत युनूस यांनी म्हटले, “या डॉक्टरांनी केवळ आपले कौशल्यच नव्हे, तर आपले हृदयही सोबत आणले आहे.”
या बैठकीत सहभागी झालेल्या २१ डॉक्टर आणि परिचारिकांचे हे पथक ढाक्यातील अपघातग्रस्तांवर उपचार करत आहे. अपघातातील बहुतांश जखमी शाळकरी विद्यार्थी आहेत. भारताने विशेष वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक तातडीने ढाक्यात पाठवले होते.
विमान अपघाताची पार्श्वभूमी :
२१ जुलै रोजी, ढाक्यातील माइलस्टोन स्कूल परिसरात चिनी बनावटीचे एफ-७बीजीआय लढाऊ विमान कोसळले.
या भीषण अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला — यामध्ये २८ विद्यार्थी, २ शाळा कर्मचारी आणि वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट तौकीर इस्लाम यांचा समावेश होता.
१६५ जण जखमी झाले असून त्यातील ७८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
बांगलादेशी सैन्याने सांगितले की, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. वैमानिकाने विमान लोकवस्तीत आदळू नये म्हणून प्रयत्न केला, मात्र ते शाळेच्या कॅम्पसवर कोसळले, जेव्हा वर्ग सुरू होते आणि शेकडो विद्यार्थी तिथे उपस्थित होते.