खास प्रतिनिधी
बार्शी / सोलापूर : स्थळ – बार्शी शहरातील मध्यवर्ती पांडे चौकातील उदय लॉज हे ठिकाण…सायंकाळचे साडेसहा वाजलेले…लॉजमध्ये गिर्हाईकांची सुरु असलेली वर्दळ…आंबट शौकीन गिर्हाईकांच्या पसंतीला उतरण्यासाठी नट्टा-फट्टा करुन बसलेल्या वेश्या…मोबाईल पाहात खुर्चीवर रुबाबात बसलेला लॉजचा चालक…अशात एक गिर्हाईक लॉजमध्ये येतं… तिथं असलेल्या एका वेश्येला हाटकतं…दोघांमध्ये बोलणी होतात…‘जे काही ठरायचं ते ठरतं’ आपल्या पसंतीच्या महिलेस ते गिर्हाईक घेऊन प्रत्यक्ष रुममध्ये जातं… तोपर्यंत लॉजमधील कोणाला कसलाही संशय येत नाही…गिर्हाईक रुममध्ये जाताच बाहेर थांबलेल्या पोलिसांना कॉल येतो…स्क्रीनवर मॅनेज गिर्हाईकाचा इनकमिंग कॉल दिसताच पुढच्या काही क्षणात पोलिसांचा वेगाने लॉजमध्ये प्रवेश होतो…पुढे सुरु होते पळापळ…आरडाओरड ..अन् लपाछपी…. धरपकड… शहरात माजते एकच खळबळ…अन् संबंधितांची निघते पोलीस ठाण्यासह कोर्टात वरात ..!
प्रसिद्ध बाजार पेठ आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या तसेच प्रत्येक आघाड्यांवर सरशी राहणार्या बार्शी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आणि नावारुपास आलेल्या उदय लॉजमध्ये पोलीस, देहविक्री करणार्या महिला तसेच लॉज मालक आणि चालक यांच्यात बराच वेळ थरार झाला. या घटनेने येथील लॉज, हॉटेल विश्वात एकच खळबळ माजली.
येथील उदय लॉजमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्रिकी करुन घेतली जात आहे. राजरोसपणे येथे हा बेकायदा धंदा चालविला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात या लॉजमध्ये वेश्यांचा कुंटणखाना बिनदिक्कतपणे चालविला जात आहे. या संदर्भात सोलापूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधक कारवाई म्हणून या विभागाने या लॉजवर धाड टाकून येथील कुंटनखाना उद्धवस्त केला. या कारवाईदरम्यान देहविक्री करणार्या सहा महिला आढळून आल्या. शिवाय कारवाईवेळी लॉज मालक आणि तसेच चालका यांनादेखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, सहा महिलांसह लॉजचा मालक आणि चालक या सर्व संबंधितांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम143(2),144(2),3(5) गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कक्षाचे पोलीस निरीक्षक रणजीत माने करत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शाखेच्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस फौजदार सविता कोकणे यांच्या पथकाने सायंकाळी साडेसहा वाजता बार्शी शहरातील मध्यवर्ती पांडे चौकात असलेल्या उदय लॉजवर मिळालेल्या माहितीनुसार अचानक धाड टाकली. या धाडी दरम्यान या पथकाला बार्शी शहर तसेच लातूर, आळंदी, कारी, येथील सहा महिला सापडल्या. या महिलांकडून अनैतिक व्यापार करवून घेणार्या लॉज मालक आनंद रमेश माने (वय 42 रा. लोकमान्य मिल चाळ, बार्शी व चालक (सुनील ऊर्फ तात्या काशिनाथ माने (वय 60, रा. लोकमान्य मिल चाळ नगर, बार्शी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पाचशे रुपये दराचे दोन चलनी नोटा, दोनशे रुपये दराचे दोन चलनी नोटा, असे एकूण चौदाशे रुपये व ऍपल कंपनीचा मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले.
देहविक्रीसाठी बार्शीसह अन्य ठिकाणच्या महिला…
येथील उदय लॉजमध्ये प्रतिबंधक कारवाईवेळी पथकाच्या हाती सहा महिला लागल्या. या महिला बार्शी शहर तसेच लातूर, आळंदी, कारी येथील आहेत. या महिलांना येथे कायम ठेवून त्यांच्याकडून शरीर विक्रीचा धंदा करुन घेतला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
काही ठळक नोंदी…
: लॉज चालक आणि मालक यास दोन दिवसांची पोलीस कोठडी
: संबंधित सहा महिलांना सुधारगृहात ठेवण्याचे बार्शी न्यायालयाचे आदेश
: उदय लॉंजमधील कुंटनखाना उद्धवस्त केल्याचे सुज्ञ नागरिकांमधून समाधान
: कारवाईने बार्शीतील अन्य लॉज विश्वात मोठी खळबळ
अटक टाळण्यासाठी राजकीय वजनाचा वापर करण्याचा प्रयत्न
लॉजमध्ये महिलांना कायमचे ठेवून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडून त्यावर गुजराण करण्याच्या गुन्ह्यात अटक होत असल्याचे कळताच उदय लॉजचे मालक आनंद माने आणि चालक सुनील माने या दोघांनी बार्शीतील राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींकडे वशीला लावून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी थेट कारवाई केली.
‘उदय’वर कारवाई झाली अन्य लॉजचे काय?
महिला ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यावसाय करुन घेण्याच्या प्रकरणात बार्शी येथील केवळ उदय लॉजवर कारवाई करण्यात आली. मात्र या शहरातील अनेक लॉजमध्ये असेच तरुणाईला नासविण्याचे कुंटनखाने चालविले जात आहेत. तेसुद्धा उद्धवस्त करण्यात यावेत, त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात यावी, एकट्या उदय लॉजवरच कारवाई का? असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.
६० : ४० अशी होती म्हणे वाटणी
बार्शीतील उदय लॉज मध्ये ज्या महिलांना देहविक्री करण्यास लावले जात होते, त्यादरम्यान होणाऱ्या धंद्यापैकी प्रति गिराईक पाठीमागे संबंधित महिलेला 40 टक्के आणि लॉज मालकाला 60 टक्के कमाईचा हिस्सा होता असे सांगण्यात आले.