अमरावती, 11 ऑगस्ट –
महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार यादीवरील आक्षेप वेळेत नोंदवण्याचे आवाहन करत विरोधी पक्षांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या ‘खोटे बोला, रेटून बोला’ या भूमिकेत आहेत. प्रत्येक पक्षाचे बूथ पातळीवरील एजंट असतानाही, जेव्हा मतदार यादीवर आक्षेप घेण्याची संधी होती, तेव्हा ती घेतली नाही.
बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पराभूत झाले तरी आक्षेप घेतला नाही, तर नाना पटोले अवघ्या 200 मतांनी जिंकूनही आक्षेप नोंदवला नाही. राज्यातील एक लाख बूथपैकी कोणत्याही बूथवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवला गेला नाही. मतदान यंत्रे सील करतानाही कुणी आक्षेप घेतला नाही. आता निवडणुकीनंतर मतदार यादी चुकीची होती, असे सांगणे योग्य नाही.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 2 कोटी 50 लाख मते मिळाली आणि 31 खासदार निवडून आले, तेव्हा मतदार यादी आणि मतदान यंत्रे योग्य होती. पण भाजप जिंकली नाही, की लगेच यंत्रे आणि यादीवर शंका घेतली जाते, हा प्रकार थांबला पाहिजे.
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असून, भाजप आणि महायुती 51 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवतील.