नवी दिल्ली, 16 ऑगस्ट – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटमधील काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी हंगामात बहुदिवसीय सामन्यांदरम्यान एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडूला मैदानात उतरता येणार आहे. हा नियम फक्त एकापेक्षा जास्त दिवस चालणाऱ्या सामन्यांसाठी लागू असेल.
सध्या केवळ डोक्याला दुखापत (कंकशन) झाल्यासच बदली खेळाडूला परवानगी दिली जाते. पण बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतर गंभीर दुखापतींसाठीही हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही दुखापत मैदानावर आणि खेळादरम्यान झाली पाहिजे.
अलीकडे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत आणि ख्रिस वोक्स यांना गंभीर दुखापत झाल्याने ते सामन्यातून बाहेर पडले होते. यावरूनच हा मुद्दा चर्चेत आला. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने या नियमावर टीका केली असली तरी गौतम गंभीरने त्याचे स्वागत केले आहे.
बीसीसीआयने अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या कार्यशाळेत नवीन नियमनाबाबत माहिती दिली. हा नियम सीके नायडू ट्रॉफी आणि अंडर-19 मल्टी-डे टूर्नामेंटमध्ये लागू होणार आहे. मात्र सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेत तो लागू होणार नाही. आयपीएलमध्ये हा नियम लागू करायचा की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.