सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)।
प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून सकृतदर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने यांचं मुख्य आरोपी आहेत. पण, डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय ?, याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा ‘सीडीआर’ काढला आहे. त्यांच्या मोबाईल ‘सीडीआर’नुसार १८ एप्रिलला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉलची संख्या २७ पर्यंत आहे. रात्री आठनंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुलगी नेहा व पत्नी डॉ. उमा त्यावेळी घरीच होते. त्यामुळे डॉक्टरांनी कॉल केलेले किंवा त्यांना कॉल करणारे ते चौघे कोण, याचा तपास पोलिस करीत आहेत. मनीषा मुसळे माने यांनी डॉ. शिरीष वळसंगकर, त्यांची पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन यांना पाठविलेल्या ई-मेलसंदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता. मनीषाने राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यावर डॉ. शिरीष यांनीच त्यांना निर्णयापासून थांबविले होते. त्यानंतर घरी गेलेल्या डॉ. शिरीष यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यामागे नेमके कारण काय ?, त्यांना त्रास कोणाचा होता ?,
अशा प्रश्नांची उत्तरे चार्टशिट न्यायालयात पाठविण्यापूर्वी पोलिसांना शोधावीच लागतील. त्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ मिळविला आहे. त्याची पडताळणी स्वतंत्र अंमलदारामार्फत सुरू आहे. डॉक्टरांकडे दोन मोबाईल होते. एक हॉस्पिटलमधील कामांसाठी तर दुसरा वैयक्तिक कामासाठी मोबाईल होता.