अमरावती, 12 सप्टेंबर। परराज्यात नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनासाठी वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी परिवहन विभागाने सुरू केलेली BH (भारत सीरिज) ही वाहन नोंदणी प्रणाली मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेताना रोड टॅक्स वेळेवर भरणे अनिवार्य असून, टाळाटाळ केल्यास आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते.
BH सीरिजसाठी वाहनधारकांना दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागतो. जर हा कर ठरलेल्या वेळेत न भरला, तर दररोज १०० रुपये दंड आकारण्यात येतो. त्यामुळे एक वर्ष कर न भरल्यास तब्बल ३६,५०० रुपयांचा दंड लागण्याची शक्यता असते.
यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नेण्यासाठी स्थानिक आरटीओकडून पासिंग करावी लागत होती. मात्र BH सीरिजमुळे ही अडचण दूर झाली असून, वाहन क्रमांकातच ‘BH’ आणि नोंदणी वर्ष नमूद असते. महाराष्ट्रात नेहमीच्या क्रमांकांची सुरुवात ‘MH’ ने होते, तर BH सीरिज हे वाहन सर्व राज्यांमध्ये वापरण्याची मुभा देतो.
परिवहन विभागाने वाहनधारकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले असून, दंड टाळण्यासाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवर्जून सांगितले आहे.
कुठून अन् कसा घ्यायचा नंबर?
बीएच सीरीजचा वाहन क्रमांक घेण्यासाठी ज्या राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झाले आहे तेथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून हा नवीन पद्धतीचा क्रमांक तुमच्या वाहनासाठी घेता येऊ शकतो.