नवी मुंबई, 1 एप्रिल (हिं.स.)।
ऐरोली, सेक्टर 15 येथे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक तेथील वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमुळे देशातील अत्त्युत्तम स्मारक असल्याचे अभिप्राय त्याठिकाणी भेटी देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींप्रमाणेच सामान्य नागरिकांकडूनही व्यक्त करण्यात आलेले आहेत.
स्मारकातील बाबासाहेबांचा जीवनप्रवास दाखविणा-या अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह असणारे संग्रहालय, आभासी चित्रप्रणालीव्दारे (Holographic Presentation) बाबासाहेबांचे भाषण ऐकण्याचा सुवर्णयोग देणारा विशेष कक्ष, ध्यानकेंद्र अशा विविध नाविन्यपूर्ण सुविधांप्रमाणेच येथील आधुनिक ‘ई लायब्ररी’ सह असलेले समृध्द ग्रंथालय हा या स्मारकाचा आत्मा आहे असेही मत स्मारकाला भेटी देण्या-या अभ्यासकांकडून मांडले जाते.
‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार या स्मारकातून व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी सुरूवातीपासूनच विविध मान्यवर व्यक्तींच्या व्याखानांचे आयोजन करीत ज्ञानजागर करण्याचा वसा जोपासला आहे.
या अनुषंगाने मागील नियमितपणे ‘विचारवेध’ या शिर्षकांतर्गत साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात येत आहे. त्यासोबतीनेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून ‘जागर’ ह्या मान्यवर व्यक्तींच्या विविध विषयांवरील व्याख्यानांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन जयंतीपूर्वीच्या पंधरवड्यात करण्यात येते. या सर्व उपक्रमांना श्रोत्यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे. एवढेच नव्हे तर यापुढे कोणाचे व्याख्यान अशी विचारणाही जाणकार वाचक, रसिकांकडून करण्यात येते.
‘जागर’ व्याख्यानमालेची ही वैचारिक परंपरा कायम राखत यावर्षी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘जागर 2025’ या व्याख्यान शृंखलेचे सायं. 6.30 वा. आयोजन करण्यात आलेले आहे.
या जागरामध्ये –
बुधवार, दि. 2 एप्रिल रोजी सुप्रसिध्द व्याख्याते डॉ. हरीश वानखेडे यांचे ‘सामाजिक न्याय आणि समानता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, दि. 4 एप्रिल रोजी नामवंत साहित्यिक – व्याख्याते प्रा.प्रवीण दवणे हे ‘युवकांचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ह्रदयसंवाद साधणार आहेत.
रविवार, दि. 6 एप्रिल रोजी लोकप्रिय कवी – व्याख्याते अरूण म्हात्रे हे ‘प्रिय भिमास…’ या अभिनव कार्यक्रमातून कविता आणि गीतांचे सादरीकरण करणार असून त्यांच्यासमवेत गंधार जाधव आणि गाथा जाधव-आयगोळे हे कलावंत काव्यजागरात सहभागी होणार आहेत.
मंगळवार, दि. 8 एप्रिल रोजी नामांकित व्याख्याते प्रा. हर्षद भोसले यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाविषयीचा दूरदृष्टीकोन’ या विषयावर व्याख्यान आहे.
गुरूवार, दि. 10 एप्रिल रोजी फँड्री, सैराट, लापता लेडी अशा विविध चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या नामांकित अभिनेत्री श्रीम.छाया कदम यांची अनुभवसमृध्द जीवनप्रवास उलगडविणारी मुलाखत संपन्न होणार आहे.
शुक्रवार, दि. 11 एप्रिल रोजी नामवंत व्याख्याते प्रा.मृदुल निळे यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील समाजातील उपेक्षितता, मुक्ती आणि जाणीव याबाबतचे विचार’ या विषयावर व्याख्यान असणार आहे.
रविवार, दि. 13 एप्रिल रोजी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविणारे तरूण पिढीचे काही शिलेदार हे ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत उपस्थितांशी सुसंवाद साधणार आहेत.
अशी विविध व्याख्यानपुष्पे गुंफत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यापूर्वी पंधरवडाभर वैचारिक आदरांजली अर्पण केली जाणार असून याप्रसंगी ज्ञानाचा जागर करण्यासाठी नागरिकांनी व त्यातही विशेषत्वाने युवकांनी कार्यक्रमांच्या दिवशी सायं. 6.30 वा. एक ते दीड तास चालणा-या व्याख्यानांचा वैचारिक आस्वाद घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली- मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.