पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील महागठबंधनमध्ये अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. काँग्रेस-राजद, काँग्रेस-सीपीआय आणि राजद-व्हीआयपी या पक्षांमध्ये तब्बल 11 जागांवर आमनेसामनेची स्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या मतभेदांमुळे महागठबंधनचा पेच अधिकच वाढला आहे.
काँग्रेस-राजद आमने सामने
महागठबंधनमधील सहा जागांवर काँग्रेस आणि राजद आमने सामने आहेत, तर तीन जागांवर काँग्रेस-सीपीआय यांच्यात संघर्ष आहे. तसेच दोन जागांवर राजद आणि व्हीआयपी पक्ष आमने सामने आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 19 ऑक्टोबर असल्याने तणावाचा वातावरण अधिकच तीव्र झालं आहे.
काँग्रेसचा राजदवर आरोप
बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम यांच्या कुटुंबा मतदारसंघातून राजदने सुरेश पासवान यांना उमेदवारी दिल्याने वाद वाढला आहे. राजेश राम यांनी राजदवर आरोप करत म्हटलं की, “तेजस्वी यादव आघाडीच्या कराराच्या विरोधात काम करत आहेत आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व कमी करत आहेत.”
राजदच्या माहितीनुसार, त्यांनी दिनारा, डिहरी, सासाराम, नवनीनगर, नोह, रफीगंज, टिकारी, नवादा, रजोली, रुन्नीसैदपूर, सुरसंड आणि बाजपट्टी या जागांवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डिहरी आणि सासाराम या दोन्ही जागांवर काँग्रेस आणि राजद दोघेही दावा करत आहेत.
CPI आणि VIP पक्षही संघर्षात
कहलगाव, वैशाली, लालगंज, सिकंदरा, कुटुंबा आणि वारिसलीगंज या मतदारसंघांवर काँग्रेस आणि राजद यांच्यात आमनेसामनेची स्थिती आहे. तर बेगुसरायमधील बछवाडा जागेवर काँग्रेस आणि सीपीआय यांच्यात सामना आहे. सीपीआयनं रोसडा, बिहारशरीफ आणि राजापाकड या जागांवरही उमेदवार उभे केले आहेत.
त्याचप्रमाणे, तारापूर आणि चैनपूरमध्ये व्हीआयपी आणि राजद आमने सामने आहेत. चैनपूरमधून राजदकडून बृज किशोर बिंद यांना आणि व्हीआयपीकडून बालगोविंद बिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
महागठबंधनच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण न दिल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रचाराच्या तोंडावर हा अंतर्गत तिढा महागठबंधनसाठी मोठे आव्हान ठरत आहे.