पाटणा, २३ ऑगस्ट: पाटण्याजवळील शाहजहांपूर परिसरात एका ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी बहुतांश महिला असून ते सर्व नालंदा जिल्ह्यातील हिलसा तालुक्याचे रहिवासी होते.
पोलिसांनी सांगितले की, हे लोक भाद्रपद अमावस्येच्या निमित्ताने फतुहा येथे गंगास्नानासाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरीजवळ ट्रक आणि ऑटोमध्ये भीषण धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले.
जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस अपघाताच्या कारणांची चौकशी करत आहेत.