मुंबई, १६ मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे या तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.
विधान परिषदेत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहेत. उद्या, सोमवारी अर्ज दाखल करायचा आहे. संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
विधान परिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. प्रवीण दटके हे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ, रमेश कराड हे लातूर ग्रामीण, गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघ, आमश्या पाडवी हे अक्कलकुवा, तर राजेश विटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
आता पोटनिवडणूक होणार असल्याने नव्याने नियुक्ती होणाऱ्या पाच उमेदवारांचा कार्यकाळ हा वरील पाच जणांच्या विधानपरिषदेतील कार्यकाळ ज्या दिवशी संपणार होता त्या दिवसापर्यंतच असणार आहे.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
सोमवार, 17 मार्चपर्यंत नामांकन अर्ज दाखल करणे.
दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, 18 मार्च रोजी केली जाईल.
नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, 20 मार्च
गुरूवार, 27 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी करण्यात येईल.
ही संपूर्ण प्रक्रिया 29 मार्चपर्यंत पूर्ण होईल.