नवी दिल्ली, 12 सप्टेंबर। बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा उल्लेख झाला आहे. बिहार काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबाबत एक एआय तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर आता मोठा वाद उफाळला आहे.
या व्हिडीओनंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली असून अशा व्हिडीओमुळे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याचे म्हटले. तर काँग्रेसने सदर व्हिडीओ कुणाचाही अनादर राखण्यासाठी केलेला नसल्याचे सांगितले.
भाजपने थेट राहुल गांधींवर आरोप केला आहे की, त्यांच्या सांगण्यावरूनच मोदींच्या आईचा अपमान केला जात आहे. भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले, “काँग्रेस पक्ष बेशरमपणाच्या कळसाला पोहोचला आहे. आधी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींच्या आईला शिव्या दिल्या गेल्या आणि आता एआय व्हिडिओ तयार करून त्यांचा अपमान करण्यात येतोय. मोदींच्या आई आता या जगात नाहीत, तरीही अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसने हे थांबवायला हवे. देश आणि बिहारची जनता याचा बदला जरूर घेईल.”
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही काँग्रेसवर टीका केली. त्यांनी सांगितले, “पंतप्रधानांच्या आईचा अपमान हा अत्यंत निंदनीय आहे आणि देश हे कदापि सहन करणार नाही. बिहारची जनता त्यांना धडा शिकवेल, कारण मोदींची आई ही आमचीही आई आहे.”
भाजप खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी म्हटलं “पंतप्रधान मोदींनी नेहमीच राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवलं आहे. पण काँग्रेसने आधी शिवीगाळ केली आणि आता एआय/डीपफेक वापरून देशाला गोंधळात टाकण्यासाठी आणि सगळ्या मातांचा अपमान केला आहे. हे राजकारणाचं एक नवीन नीच स्तर आहे.”
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर टीका केली. त्यांनी लिहिलं, “काँग्रेसने व्हिडिओद्वारे सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत. पंतप्रधानांच्या आईचा अपमान केल्यानंतर खेद व्यक्त करण्याऐवजी, काँग्रेसने आरोपीचं समर्थन केलं आहे.”
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) आता ‘नारी शक्तीचा अपमान’ करणाऱ्या पक्षासाठी ओळखली जावी का? काँग्रेसच्या बिहार युनिटने अधिकृत हँडलवरून एक फेक, घृणास्पद AI कॅरिकेचर वापरून पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान केला आहे. हा प्रकार फक्त पंतप्रधानांच्या आईचाच नव्हे तर भारतातील प्रत्येक आई, बहिण आणि मुलीचा अपमान आहे.”
बिहार काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ३६ सेकंदाचा एक एआयने तयार केलेला व्हिडीओ शेअर केला. ज्यात पंतप्रधान मोदी म्हणतात, “आजची मतदान चोरी झाली. आता झोपायला जातो.” यानंतर पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांच्या मातोश्री दाखविल्या गेल्या. त्या म्हणतात, “तू नोटबंदीनंतर मला बँकेच्या रांगेत उभे केलेस. माझे पाय धुण्याचे रिल बनवलेस आणि आता बिहारमध्ये माझ्या नावावर राजकारण करत आहेस.” यानंतर पंतप्रधान मोदी झोपेतून दचकून उठताना दाखवले गेले आहे.