नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेता परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यासंबंधीची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली. भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीचा कार्यभार स्वीकारतील.
परेश रावल यांच्याआधी राजस्थानी कवी अर्जुन देव चरण हे एनएसडीच्या चेअरमनपदी होते. २०१८ मध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोशल मीडियावर परेश यांच्या नियुक्तीची माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘प्रख्यात कलाकार माननीय परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा फायदा होईल. हार्दिक अभिनंदन.
संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की,, “प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परेश रावल भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहमदाबाद पूर्वमधून खासदार होते. परेश रावल यांनी आपल्या सिनेकारकिर्दिची सुरुवात ‘होली’ सिनेमातून केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांनी नुसत्या भूमिका साकारल्या नाहीत तर त्या भूमिकांना न्याय दिला. सिनेमांमध्ये खलनायक असो किंवा कॉमेडियन भूमिका प्रत्येकवेळी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या याच कामामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.