अमरावती, 16 ऑगस्ट – धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर गावात तब्बल १८ बोगस घरकुल प्रकरणे उघडकीस आली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून गठीत चौकशी समितीच्या अहवालानुसार, या प्रकरणात २० लाख रुपयांपेक्षा जास्त निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गावातील काही व्यक्तींनी खोट्या नावांनी घरकुल योजनेचे अनुदान घेतल्याचे समोर आले आहे. एका कुटुंबातील पती, पत्नी आणि नातेवाईक या तिघांच्या नावावर स्वतंत्र घरकुले मंजूर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. यामुळे प्रत्यक्षात गरजू आणि गरीब कुटुंबांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही.
चौकशी अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.