शिर्डी, 24 जुलै – लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साई मंदिराला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली असून, या घटनेमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. साईबाबा मंदिर ट्रस्टने तत्काळ शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत मान नावाच्या व्यक्तीने ईमेलद्वारे धमकी दिली असून, ईमेल आयडी bhagvanthmann@yandex.com
वरून हा संदेश आला आहे. या ईमेलमध्ये समाधी मंदिर आणि द्वारकामाई परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांत दुसरी धमकी
मे महिन्यातही शिर्डी साई मंदिराला याचप्रकारची धमकी देण्यात आली होती. त्या वेळी ‘अजित जोकामुल्ला’ या ईमेल आयडीवरून पाईप बॉम्बसंदर्भातील धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आधीच वाढवलेली सुरक्षा आता अधिक कडक करण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणा सज्ज
धमकीनंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी केली जात आहे. साई संस्थानचे सुरक्षा कर्मचारी पुरुष आणि महिलांची स्वतंत्र तपासणी करत आहेत. पोलीस दल, बॉम्ब शोध पथक, आणि सायबर सेल एकत्रितपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सतर्कतेचे आवाहन
शिर्डीकरांना आणि भाविकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.