नवी दिल्ली , 12 सप्टेंबर। दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, न्यायाधीशांच्या खोलीत तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे. ही ईमेल येताच संपूर्ण न्यायालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दिल्ली उच्च न्यायालयातील वकील आणि न्यायाधीशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी कोर्ट परिसर रिकामा केला जात आहे.
ईमेल दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. ईमेलमध्ये फक्त ‘कोर्ट’ असं सुरुवातीला लिहिलं असून, कोणत्या न्यायालयाचा उल्लेख नव्हता. परंतु शेवटी स्पष्टपणे दिल्ली उच्च न्यायालयाचा उल्लेख करण्यात आला होता, त्यामुळे प्राथमिकतेनं दिल्ली हायकोर्ट रिकामं करण्यात आलं. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. पोलिसांची एक टीम सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम करत आहे, तर दुसरी टीम संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की, तमिळनाडूने पाकिस्तानसोबत हातमिळवणी केली असून, कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवले आहेत. ईमेल डॉ. शाह फैसल नावाच्या शिया मुस्लिम व्यक्तीच्या नावाने पाठवले गेले आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, त्याने 1998 मधील पटना बॉम्बस्फोट पुन्हा घडवण्यासाठी कोयंबतूरमधील पाकिस्तानी आयएसआय सेलशी यशस्वीरित्या संपर्क साधला आहे. ईमेलमध्ये डीएमके पक्षातील अंतर्गत वाद, घराणेशाही, आणि राजकीय समीकरणांचा उल्लेख आहे. यामध्ये म्हटलं आहे की“धर्मनिरपेक्ष पक्ष (सेक्युलर पार्टी) भाजप/आरएसएसशी लढण्यासाठी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात. जेव्हा उत्तराधिकारी (राहुल गांधी, उदयनिधी) यांना सत्तेपासून दूर ठेवले जाते, तेव्हा त्यांचा आरएसएसविरोधी संघर्षात रस कमी होतो.”
“नवे धर्मनिरपेक्ष नेतृत्व उभं करण्यासाठी, पारंपरिक वारसांना बाजूला काढण्याची योजना आखण्यात आली आहे.”
ईमेलमध्ये म्हटलं आहे की, डॉ. एझिलन नागनाथन यांना डीएमकेची कमान सोपवावी, या आठवड्यात उदयनिधी स्टालिन यांचा मुलगा इनबानिधी याच्यावर ऍसिड हल्ला होईल. हा हल्ला ‘अंदरून’ घडवण्यात येईल, आणि गुप्तचर यंत्रणांना याचा सुगावा लागू देणार नाही. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की,2017 पासूनच या “पवित्र शुक्रवार”साठी तयारी सुरू होती. आज दिल्ली उच्च न्यायालयात होणारा स्फोट पूर्वीच्या इशाऱ्यांवरील शंका दूर करेल. दुपारी नमाजीनंतर जज चेंबरमध्ये स्फोट होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
ईमेलमध्ये बॉम्ब कुठे ठेवले आहेत आणि त्यांना कसे निष्क्रिय करायचं याची माहिती देखील आहे.त्यात लिहिलं आहे की, बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क करा.त्याचा मोबाईल नंबर दिला आहे, तसेच एक कोड दिला आहे जो वापरून बम निष्क्रिय करता येईल.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत, आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणाचा हात आहे, मेल कुठून पाठवण्यात आला आहे याचा शोध घेण्यात येत आहे.