नवी दिल्ली, 20 ऑगस्ट – राजधानी दिल्लीतील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तब्बल ५० शाळांना ईमेलद्वारे धमकीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. नजफगड आणि मालवीय नगरमधील दोन शाळांना अशी धमकी मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील शाळा व महाविद्यालयांना अशा प्रकारच्या ईमेलद्वारे धमक्या येत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या सोमवारी मिळालेल्या धमकीत पैशांची मागणीही करण्यात आली होती. दिल्लीतील ३२ शाळांना पाठवलेल्या मेलमध्ये ५०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ४,३५,४२७ रुपये) भरण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
यापूर्वी आलेल्या मेलमध्ये फक्त धमक्या देण्यात येत होत्या, मात्र पैशांची मागणी नव्हती. सोमवारी मिळालेल्या मेलमध्ये दक्षिण दिल्लीतील ७, दक्षिण-पश्चिम दिल्लीतील १३, द्वारका परिसरातील ११ आणि मध्य दिल्लीतील १ अशा एकूण ३२ शाळांना लक्ष्य करण्यात आले होते.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व मेल एकसारखे असून ते जीमेल आयडीवरून पाठवण्यात आले आहेत. पोलिस सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत असून शाळांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
