कोलकाता, 07 सप्टेंबर : बांगलादेश मुक्ती संग्रामात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका यावर आधारित ‘बांगलादेश मुक्तियुद्ध के नेपथ्य में नेताजी ?’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी 6 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता करण्यात आले. कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीट येथील प्रसिद्ध कॉफी हाऊसमध्ये दीप प्रकाशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार व माहितीपट निर्माते मृन्मय बॅनर्जी, कोलकाता विद्यापीठाचे प्राचार्य आणि आशुतोष म्युझियम ऑफ इंडियन आर्टचे संचालक डॉ. दीपक बोरपांडा, रासबिहारी बोस रिसर्च ब्युरोचे संस्थापक तपन भट्टाचार्य, तसेच दीप प्रकाशनीच्या सीईओ सुकन्या मंडल हे मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, बांगलादेशमधून डॉ. सुब्रत घोष आणि प्रो. प्रवीर कुमार सरकार (नोंदणी अधिकारी, ढाका विद्यापीठ) यांनीही या कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात “जगाओ पथिके, ओ जे घुमे अचेतन” या गीताने झाली. उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये अनेक ऐतिहासिक संदर्भ मांडले आणि स्पष्ट केले की जरी नेताजींची भूमिका आजाद हिंद फौज व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सर्वश्रुत आहे, तरी बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर फारसा प्रकाश टाकलेला नाही.
पुस्तकाचे लेखक डॉ. जयंत चौधरी यांनी दावा केला की पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात बांगलादेश मुक्ती संग्राम व नेताजींशी संबंधित अनेक गोपनीय फाईल्स नष्ट करण्यात आल्या. त्यांनी हेही नमूद केले की, बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर तेथील तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांनी म्हटले होते की, “नेताजी जिवंत आहेत, नाहीतर बांगलादेश स्वतंत्र झाला नसता.” त्यांनी कोलकात्यात एका जाहीर सभेत या विषयावर सविस्तर बोलण्याचेही जाहीर केले होते. मात्र, काही आठवड्यांनंतर ब्रिगेड परेड ग्राउंड येथे पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत दिलेल्या दीर्घ भाषणात मुजीब यांनी नेताजींचा उल्लेखही केला नाही.
चौधरी यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे अनेक पुरावे सादर करत दाखवले की बांगलादेश मुक्ती संग्रामातील काही वास्तविक घटनांना कसे गुप्त ठेवण्यात आले. या पुस्तकात या सर्व ऐतिहासिक व वादग्रस्त पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे, ज्यामुळे नेताजींचे चाहते आणि अभ्यासक यांच्यात नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.