ब्राझिलिया, ५ ऑगस्ट – ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपती जैयर बोलसोनारो यांना सत्तापालटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली घरात नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. फेडरल पोलिसांनी बोलसोनारो यांच्या ब्रासीलिया येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा मोबाईल जप्त केला असून आता त्यांना कुठेही जाण्याची परवानगी नाही.
या आदेशानुसार बोलसोनारो यांना इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर (टॅग) घालणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जाणार आहे. न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरेस यांनी सांगितले की बोलसोनारो यांनी सोशल मीडियावर बंदी असतानाही आपल्या तीन खासदार मुलांच्या खात्यांद्वारे नियमभंग केला आहे.
३ ऑगस्ट रोजी बोलसोनारो यांनी रिओ दि जानेरोमध्ये आपल्या समर्थकांना संबोधित केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या कारवाईचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटला असून अमेरिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत निंदा केली आहे. विशेषतः अमेरिका आणि ब्राझील यांच्यात सध्या चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई घडल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
फक्त बोलसोनारोच नव्हे तर त्यांचे ३३ सहयोगीही तपासाच्या रडारवर असून, त्यांच्यावर लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप आहेत.