ब्राझीलिया, 10 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (दि.९ जुलै) जागतिक व्यापारासंदर्भात एक कठोर पाऊल उचलत अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली.ट्रम्प यांनी ब्राझीलवर थेट ५० टक्के शुल्क लादत याला आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई असल्याचे म्हटले आहे. हे सर्व शुल्क १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी यांनी प्रत्युत्तराचे आव्हान दिले आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेला आर्थिक प्रत्युत्तरात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या कार्यालयाने अमेरिकेच्या शुल्कवाढीला प्रत्युत्तर म्हणून कठोर भूमिका घेत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे, “एखाद्या देशाने एकतर्फी शुल्क वाढवल्यास, ब्राझील कायद्यांतर्गत त्याला प्रत्युत्तर देईल.” यामुळे आता अमेरिका आणि ब्राझील यांच्यात संभाव्य व्यापार युद्धाची शक्यता अधिक गडद झाली आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासोबत होत असलेल्या वर्तणुकीच्या संदर्भात घेतला असल्याचे म्हटले आहे. बोल्सोनारो यांच्यावर सध्या सत्तापालटाच्या कटाच्या आरोपाखाली खटला सुरु आहे. दरम्यान, ब्राझील अमेरिकेसोबत न्याय्य व्यापार करत नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
ब्राझील एक सार्वभौम राष्ट्र आहे, ज्याच्या स्वतःच्या स्वतंत्र संस्था आहेत. आम्ही कोणताही विदेशी हस्तक्षेप मान्य करणार नाही, असे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे ब्राझीलच्या न्यायव्यवस्थेच्या अखत्यारीत आहे आणि त्यावर कोणताही बाह्य दबाव प्रभाव टाकू शकणार नाही. सत्तापालटाच्या कटात सामील असलेल्या लोकांवर चालणारे खटले आमच्या न्यायव्यवस्थेच्या अधिकारक्षेत्रात आहेत. त्यांना कोणत्याही धमकी किंवा बाह्य हस्तक्षेपाने प्रभावित केले जाऊ शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ब्राझीलमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ द्वेष, हिंसा किंवा अपमानजनक भाषा पसरवण्याची सूट नाही. सरकार कोणत्याही प्रकारची ऑनलाइन द्वेषपूर्ण भाषणे वंशवाद, बाल शोषण किंवा इतर गुन्हे सहन करणार नाही. देशात कार्यरत असलेल्या सर्व कंपन्यांना, मग त्या देशांतर्गत असोत वा विदेशी, ब्राझीलच्या कायद्यांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर शुल्क लावण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना, ब्राझीलने अमेरिकेच्या निवडणुका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांचे आरोप निराधार आणि तथ्यांची मोडतोड करणारे असल्याचे म्हटले आहे. गेल्या १५ वर्षांत अमेरिका आणि ब्राझील यांच्यातील व्यापार संतुलन अमेरिकेच्या बाजूने राहिले आहे. या काळात अमेरिकेला एकूण ४१० अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे आणि हा केवळ दावा नसून, खुद्द अमेरिकेची सरकारी आकडेवारीच हे दर्शवते, असेही त्यांनी म्हटलं आहे.