शिमला, 1 जुलै (हिं.स.) हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी
दरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात पावसादरम्यान
नालागड-स्वारघाट रस्त्यावर एक मोठा अपघात झाला. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट
कॉर्पोरेशन अर्थातच एचआरटीसीची बस अनियंत्रित होऊन उलटली. यामध्ये ४४ हून
अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, वळणावर हिमाचल रोडवेज बसचा अचानक तोल
गेला. त्यानंतर ती रस्त्यावरून उलटली.
प्रत्यक्षदर्शींच्या
मते, गोलजमाला
जवळील वळणावर वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या
कडेला उलटली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ नालागड
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. तर
उर्वरित प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर इतर प्रवाशांना महामंडळाच्या
दुसऱ्या बसने चंदीगढला पाठवण्यात आले.
एचआरटीसीचे
उपविभागीय व्यवस्थापक विवेक लखनपाल यांनी सांगितले की, ही बस सरकाघाटहून नालागडमार्गे चंदीगढला
जात होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हिमाचल प्रदेशात गेल्या
काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आतापर्यंत कुल्लू, कांगडासह अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना
घडल्या आहेत.