ओटावा, 17 सप्टेंबर। कॅनडामध्ये खालिस्तानी समर्थकांकडून होणारा हिंसाचार पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) ही संघटना भारताविरुद्ध कट रचण्याच्या तयारीत आहे.
एसएफजेने वँकूव्हरमधील भारताच्या वाणिज्य दूतावासावर ताबा घेण्याची धमकी दिली आहे. तसेच, त्यांनी भारतीय नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचा इशाराही दिला आहे. तथापि, या प्रकरणावर भारत किंवा कॅनडा सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
एसएफजे संघटनेने गुरुवारी (१८ सप्टेंबर) दूतावासावर कब्जा करणार असल्याची धमकी दिली आहे. एसएफजेने एक पोस्टर देखील जारी केले आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांच्या चेहऱ्यावर गन टारगेटचे निशाण दाखवले आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या सरकारने एका अंतर्गत अहवालात देशात खालिस्तानी दहशतवादी संघटनांची उपस्थिती असल्याचे मान्य केले होते. या गटांमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ आणि ‘इंटरनॅशनल एसवायएफ’ यांचा समावेश आहे. हे दोन्ही गट कॅनडामध्ये दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट आहेत.