मुंबई, 23 ऑगस्ट – रिलायन्स कम्युनिकेशन्सचे प्रमोटर संचालक अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कथित बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरकॉमविरुद्ध गुन्हा दाखल करून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.
सीबीआयच्या पथकांनी अनिल अंबानी व आरकॉमशी संबंधित मुंबईतील जागांवर ही कारवाई केली. अनिल अंबानी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान पोहोचवल्याचा आरोप आहे. मात्र, आरकॉमकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2025 रोजी बँकेने या फसवणुकीची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे केली होती. त्यानंतर सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांना 17,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या चौकशीसाठी दिल्लीला बोलावले होते. तसेच, ईडीने आरकॉमशी संबंधित 50 व्यावसायिक संस्था व रिलायन्स ग्रुपशी संलग्न 25 व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते.