नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत सुखद धक्का दिला. मात्र काही वेळातच त्यांनी या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
देशभरात कोविड १९ लसीकरणाची सराव फेरी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘ड्राय रन’चा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या घोषणंच स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केलं.
देशभरात मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. “देशभरात लस पुरवली जाणार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे.
प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली. तसेच, “देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यानी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.
दरम्यान देशभर आज ड्राय रन सुरू असताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी ही लस मोफत दिल्लीवासियांना दिली जाणार असं म्हटलं होतं. तर आता नेमकी कधी लशीला अंतिम मान्यता मिळणार याची अनेकांना प्रतिक्षा आहे. एका लसीच्या डोसचा अंदाजे खर्च २२०-२५० आहे. या लसीचे २ डोस दिले जाणार आहेत. पण आता सारा खर्च पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्र सरकार उचलणार आहे.
नुकतीच सीरम इन्सिट्युटच्या कोविशिल्डला तज्ञ समितीने मंजुरी दिली आहे. आता अंतिम मंजुरी DGCI देणार आहे. कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस देखील मंजुरीच्या प्रतिक्षेमध्ये आहे. अजून काही माहितींची पुर्तता केल्यानंतर त्याला देखील तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळू शकते.
* लसीकरण मोफत असेल का?
उर्वरित लोकांसाठी लसीकरण मोफत असेल का? या बाबत अजूनही विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. आज डॉ. हर्षवर्धन यांनी जातीने लसीकरणाच्या ड्राय रनच्या वेळेस माहिती कशाप्रकारे फीड होतेय? लसी कशा ठेवल्या आहेत ? याची माहिती घेतली आहे. देशभरातून फीडबॅक देखील घेतला आहे. दरम्यान यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी कोविड १९ च्या लशीबद्दल नागरिकांनी अफवांना बळी पडू नका असं पुन्हा आवाहन केले आहे. पोलिओ लसीच्या वेळीदेखील अशाप्रकारे अफवा पसरवल्या जात होत्या मात्र नागरिकांनी उत्स्फुर्तपणे लसीकरणाला प्रतिसाद दिला आणि आज भारत पोलिओ मुक्त आहे.