सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)।
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नुकत्याच सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसह इतर माध्यमातून ८३७ कोटी २९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात प्रवासी वाहतुकीतून ३७८ कोटी २० लाख तर मालवाहतुकीतून ४२१ कोटी ५६ लाख रुपये अणि तिकीट तपासणीसह इतर माध्यमातून १५ कोटी ५ लाख रूपये उत्पन्नाचा समावेश आहे.
मध्य रेल्वे सोलापूर विभाग भारतीय रेल्वेच्या एकूण जाळ्यात ७३८.५३ किलोमीटर लांबीच्या विस्तार केला आहे. यात सोलापूरसह पुणे, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ६५ स्थानके आणि सेवा समाविष्ट आहेत. मागील वर्षभरात सोलापूर विभागाने एकूण एक कोटी ८४ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास सेवा देत ३७८ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तर मालवाहतुकीच्या माध्यमातून ४२१ कोटी ५६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यात प्रामुख्याने सिमेंट, साखर, कोळसा, जीवनावश्यक धान्यमाल आदींची वाहतूक होते.