प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी परिसरातील तरुणाई बिना कष्टाची पैसे मिळताहेत या आमिषापोटी मोबाईलवरील ऑनलाईन चक्री जुगाराच्या नादी लागली. जुगाराचा चक्री गेम खेळण्याच्या दलदलीत सापडलेल्या साधारण 700 ते 800 तरुणांचं आयुष्य उद्धवस्त होण्याचा अक्षरश: ‘गेम’ वाजला. हा आकडा यापेक्षा नक्कीच खूप जादा असू शकतो. या तरुणांच्या पदरातलं तर होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं. पण बदनामीमुळं समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. चक्री जुगार खेळताना गेलेले पैसे परत येतील, या आमिषापोटी तरुणाई जुगार खेळतच राहिली, घरच्यांना याची काहीच कल्पना नव्हती. पोरगा मोबाईल बघतोय इतकंच घरच्यांना माहिती. मात्र, त्याने काय ताट वाढून ठेवलं हे सगळं हाताबाहेर गेल्यावरच कळलं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. तथापि, चक्री जुगाराच्या चक्रव्युहात सापडलेल्या अनेक तरुणांच्या अत्यंत भीषण कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत.
विशेषत्वे, 90 लाखाला घर जळालं , सहा एकर जमीन गेली, सोन्यासह टॅक्टरसुद्धा गेल्याचं माढा तालुक्यातील लऊळच्या एका शेतकरी तरुणाचं हे प्रातिनिधी उदाहरण अत्यंत बोलकं आहे.ज्यावरुन चक्री ऑनलाईन जुगाराच्या चक्रात अडकलेल्या तरुणांची किती भीषण अवस्था झाली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ऑनलाईन चक्री गेम अर्थात जुगाराच्या दलदलीत फसून भिकेकंगाल होण्यासह देशोधडीला लागलेल्या काही तरुणांचे समोर आलेले किस्से..!
लऊळचा आठवीपर्यंत कसबशे शिक्षण झालेला तरुण. दोन वर्षांपासून फनी चक्री व्हिडीओ जुगार खेळाच्या नादी लागला. या तरुणाचे बँक खात्यातून तब्बल 78 लाख आणि रोख स्वरुपात 5 लाख असे साधारण 83 लाख रुपये या गेममध्ये गेले. कॅनॉल पाण्याची 25 लाख रुपये एकरी भावाने या तरुणाने साडेतीन एकर जमीन या खेळासाठी विकली. शिवाय दूधाच्या पगाराचे दररोजचे साधारण अडीच हजार रुपये गेमवर लावले गेले ते वेगळेच. या खेळासाठी बचत गटाचे कर्ज काढले, तेपण गेले. टॅक्टरवर कर्ज काढले, तो आता कर्जात जाण्याच्या बेतात आहे. दूभत्या गाईसुद्धा गेल्या.काहीच शिल्लक राहिलं नाही.
किस्सा नंबर 2
कुर्डुवाडीमधील एका प्रतिष्ठित नागरिकास या ऑनलाईन जुगाराचा नाद लागला. या जुगारातून सुरुवातीला त्यांना काही पैसे मिळाले, त्यावर पुढे बिगर कष्टाचे पैसे मिळताहेत, म्हणून त्यांनी पैसे लावायला सुरुवात केली. खेळता खेळता पैसे कव्हर करण्याच्या नादात तब्बल कोटीभर रुपयांना त्यांना चुना लागला. जुगाराच्या नादात कोटीभर रुपयांना झोपलेले हे महाशय कुर्डुवाडीतील बडं प्रस्थ आहेत.
किस्सा नंबर 3
कुर्डुवाडी परिसरातील एका गावचा साधारण 18 ते 20 वर्षाचा युवक. दिवस-रात्र चक्री गेम खेळायचा. साधारण 30 लाख त्याचे या जुगारावर गेले.या गेमसाठी घेतलेल्या सावकारांचा तगादा त्याच्यामागे लागला. 30 लाखच्या लाख गेले आणि सावकरांचा तगादा मागे लागला. वडिलांनी त्याने ही गोष्ट सांगितली. नोकरीला असलेल्या वडिलांना फंड काढला तरी तेवढ्या पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. संबंधित युवक हा सावकारांची देणी देण्यासाठी जमीन विका असे वडिलांना म्हणू लागला. सुरुवातीला वडिलांनी जमीन विकण्याला हरकत घेतली, विरोध केला. त्यावर युवकाने त्यांना आत्महत्या करु असे सांगितले, ‘तुम्हाला मी हवा की जमीन’ असा सवाल या युवकाने वडिलांना केला. शेवटा जमिनीपेक्षा पोरगा प्यारा म्हणून वडिलांनी जमीन विकून सावकारांची देणी दिली.
किस्सा नंबर 4
कुर्डुवाडी परिसरातील चौघा दिवट्यांनी मागच्या तीन ते चार वर्षात व्हिडीओ गेम खेळावर साधारण 15 ते 20 लाख रुपये उधळले. विशेष म्हणजे या संबंधितांचे वडिल हे नोकरीतून रिटायर झालेले होते. आयुष्याची पुंजी म्हणून त्यांना रक्कम मिळालेली होती. आयुष्याची सायंकाळी कोणाला भार न ठरता रियाटरमेंटवेळी मिळालेली आयुष्याची शिदोरी थोडी थोडी खावी म्हणून बँकेत पैसे ठेवले होते. या संबंधितांनी आत्महत्येसंबंधी ब्लॅकमेलिंगची धमकी देत वडिलांकडून पैसे काढून घेऊन त्यांना नागवलं आणि जुगारवर पैसे संपविले.