मुंबई, 17 मार्च (हिं.स.)।इंडियन प्रीमियर लीग (IPL) 22 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर असणार आहे. उमरान मलिकच्या जागी आता फ्रँचायझीने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. त्याच्या जागी आता वेगवान गोलंदाज चेतन सकारियाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
27 वर्षीय चेतन सकारियाला गेल्या वर्षीही केकेआरने खरेदी केले होते, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या मेगा लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही, परंतु आता त्याला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. त्याला 75 लाख रुपयांमध्ये संघात जागा देण्यात आली आहे. आता चेतन सकारियाला या हंगामात संधी मिळाली तर तो नक्कीच चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.उमरान मलिक हा 150 प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतो.मेगा लिलावात उमरान मलिकला केकेआरने 75 लाखांना खरेदी केले होते, मात्र तो आता खेळताना दिसणार नाही.
सकारियाने तीन हंगामात (2021-23 ) 19 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 8.43 च्या इकॉनॉमीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. 2021 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले. त्यानंतर तो 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला. आतापर्यंत त्याने टी-20 फॉर्मेटमध्ये 46 सामन्यांमध्ये 7.69 च्या प्रभावी इकॉनॉमीने 65 विकेट्स घेतल्या आहेत.