छत्तीसगडच्या बलौदाबाजार जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना भटक्या कुत्र्याने तोंड लावलेले अन्न खायला दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ७८ विद्यार्थ्यांना अँटी-रेबीजचा डोस देण्यात आला आहे. स्थानिक आमदार संदीप साहू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
माहितीनुसार, पलारी ब्लॉकमधील लछनपूर गावातील सरकारी माध्यमिक शाळेत २९ जुलै रोजी दुपारच्या जेवणावेळी, ‘जय स्व-सहायता महिला समूह’ या स्वयंपाक समितीतील महिलांनी अन्न वाढताना एक भटक्या कुत्र्याने भाजीत तोंड लावले. काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहून शिक्षिकांना सांगितले. शिक्षिकांनी संबंधित भाजी न वाढण्याचे सांगितले, मात्र महिलांनी “भाजी खराब झालेली नाही” असा दावा करत तीच भाजी ८४ विद्यार्थ्यांना वाढली.
ही बाब विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर गावकरी आणि पालक शाळेत पोहोचले. त्यानंतर सर्वांना घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे ७८ विद्यार्थ्यांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले.
प्रकरणाची गंभीर दखल घेत एसडीएम दिनेश निकुंज, बीईओ नरेश वर्मा आणि इतर अधिकारी २ ऑगस्ट रोजी शाळेत पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे जबाब नोंदवले तसेच शाळेत तयार केलेले अन्न स्वतः खाऊन पाहिले. स्व-सहायता समूहातील सदस्यांची चौकशी अद्याप सुरू असून दोषींवर कारवाई होणार असल्याचे एसडीएम यांनी सांगितले.