लातूर, 23 जुलै – छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण अखेर पोलिसांसमोर हजर झाले असून, त्यांना तत्काळ जामीनही मंजूर झाला आहे.
या घटनेमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मारहाण प्रकरणानंतर सुरज चव्हाण फरार झाले होते. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, छावा संघटनेने त्यांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात बंदची हाकही देण्यात आली होती.
सुरज चव्हाण यांच्याविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथक त्यांच्या शोधासाठी रवाना केली होती. अखेर मंगळवारी (दि. २२) मध्यरात्री सुरज चव्हाण यांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. परंतु लगेचच त्यांना तातडीचा जामीन मंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावर विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात सुरज चव्हाणसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील १० आरोपींना अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी अहेमद शेख याची ओळख अद्याप पटलेली नाही.
अटक करण्यात आलेले आरोपी : सुरज चव्हाण, लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजित सगरे पाटील, सिद्दीक मुल्ला, वसीम मुल्ला, रवी धुमाळ आणि राजू बरगे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आणि विवेकानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
संपूर्ण घडामोडी लक्षवेधी ठरल्या असून, या प्रकरणाचा राजकीय पडसाद पुढे कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.