सोलापूर, 11 जून (हिं.स.)।
विधानसभा निवडणुका भाजपने षड्यंत्र करून जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी लेख लिहून भाजपला उघडे पाडले आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उत्तर देत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.
विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा आणि विविध विषयांसंदर्भात काँग्रेस भवन येथे मंगळवारी खा. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस हे फसवे आकडेवारी देतात. मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी अचानक कशी वाढली. याचे उत्तर देत नाहीत, सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज विचारले असता फुटेज देता येत नाही, असे सांगत आहेत.
महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत. त्याकडे लक्ष द्यावे. सरकारी अधिकार्यांवर प्रचंड दबाव आहे. कार्यकर्त्यांना काम करायला अडचण येत आहे. भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. ते त्यांनी बंद करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय हेमगड्डी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार उपस्थित होते.