क्वालालंपूर, 28 जुलै – थायलंड आणि कंबोडिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे निर्माण झालेला तणाव अखेर निवळला असून, दोन्ही देशांनी कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदी जाहीर केली आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी सोमवारी युद्ध थांबवण्याची घोषणा केली. या युद्धबंदीमध्ये चीन, अमेरिका आणि मलेशियाचा मध्यस्थीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे सोमवारी थायलंड, कंबोडिया आणि मलेशियामधील शांतता चर्चासत्र पार पडले. यामध्ये थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी युद्धबंदीची अधिकृत घोषणा केली.
तीव्र संघर्ष, नागरिकांचा मृत्यू
सीमा भागात सुरु असलेल्या गोळीबारामुळे आतापर्यंत ३३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अनेक सामान्य नागरिकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता.
अमेरिकेचा दबाव आणि मलेशियाची भूमिका
२६ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हस्तक्षेप करत थायलंड आणि कंबोडियाला तात्काळ युद्धबंदी लागू करण्याची चेतावणी दिली होती. अन्यथा व्यापार संबंध तोडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तरीही संघर्ष सुरूच राहिल्यानंतर मलेशियाने दोन्ही देशांना चर्चेसाठी निमंत्रित करत मध्यस्थीची भूमिका बजावली.
प्रेम विहार मंदिरातून सुरू झालेला वाद
हा सीमावाद नवीन नाही. १९६२ मध्ये युनेस्कोने प्रेम विहार मंदिर कंबोडियाच्या भूभागात असल्याचे मान्य केले होते. मात्र, थायलंडने या निर्णयाला आक्षेप घेतला होता. २००८ मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर वाद अधिकच पेटला. २००८, २०११ आणि २०१५ मध्ये याच वादातून तणावपूर्ण चकमकी झाल्या होत्या.
आता पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला असताना, आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि मलेशियाच्या पुढाकारामुळे युद्धबंदी शक्य झाली आहे. मात्र, युद्धबंदीच्या अटी आणि याआधी झालेल्या नुकसानीवर चर्चा अद्याप सुरूच आहे.