विशेष प्रतिनिधी
सोलापूर:
विधानसभेच्या अधिवेशनाचा काळ संपत आला तरी अजूनही दोनही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरूच आहे. गुरूवारी भलतीच शाब्दिक बाचाबाची झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जायचे राहिले होते. विधानसभेत दिशा सालियान तर विधान परिषदेत संजय राठोड यांचे प्रकरण गाजले. सालियान प्रकरणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरिष महाजन यांच्यात खडाजंगी झाली.प्रकरणत इतके हातघाईला आले होते की दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जायचे राहिले होते.विधानपरिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ ह्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर चांगल्याच कडाडल्या.भर सभागृहात त्यांनी परबांची बेईज्जतच केली.
ओ अनिल परब, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून ङ्गिरते…हिंमत आहे का? अशा शब्दात वाघांनी भरसभागृहात ललकारले. अरे मी जे केले,ते मला करायचे होते. मला जे दिसले, मला जे पुरावे आले त्यावर लढले मी तुम्ही तोंड शेवून बसला होता. तुम्ही घातले होते शेपूट, असा घणाघात चित्रा वाघांनी परबांवर केला.
परब यांनी संजय राठोड प्रकरणात तुम्ही काय केले? असा सवाल विचारला असता वाघ ह्या आक्रमक झाल्या. त्यांनी आपल्या भाषणात परबांवर जोरदार प्रहार केला.वाघ म्हणाल्या, ओ अनिल परब हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? असाल तुम्ही मोठे वकील ङ्गार मोठी पोपट पंडीत. एखाद्या विषयासाठी एखादी बाई लढते तेव्हा पाय खेचायला 100 लोकं असतात. त्यात तुमच्या सारखे आहेतच. तुम्हालाच उत्तर देत मी घाबरत नाही. तुमच्या सारखे 56 पायाला बांधून ङ्गिरते चित्रा वाघ. येथे काय वशिल्याने आलो नाही आहोत.
हिम्मत असेल तर त्यांनी (अनिल परब) विचारावे उद्धव ठाकरेंना का संजय राठोडांना क्लिनचिट दिली. तुम्ही घातले होते शेपूट. आणि मला विचारता कसे काय मंत्रिमंडळात आले?, असा संताप वाघ यांनी परबांवर व्यक्त केला.
परब ङ्गार मोठे आहेत. विधीतज्ज्ञ आहेत. हे मी त्यांच्या आसपासच्या लोकांकडून ऐकले होते. मी तर कधी त्यांची हुशारी येथे पाहिली नाही. आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत. ते मंत्रिमंडळात का आहेत? याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मीडियासमोर उत्तर त्याांनी दिले., असे देखील वाघ यांनी ठणकावले
-महिलांना दादागिरी करता…
सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे अन महिलांवर दादागिरी करायची. हिम्मत असेल तर जा विचारा उद्धव ठाकरेंना का क्लिनचिट दिली? कुठल्या मुद्यावर क्लिनचिट दिली. मी तर माजी लढाई लढले. लढणार. काही नाही मिळाले तर आमच्या घरादारावर येता., असे प्रत्यत्तर वाघांनी परबांना दिले. सत्तेचा माज तुमच्या आकासमोर दाखवा!
महाजन यांना दानवेंनी सुनावले
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरूवारी दिशा सालियान प्रकरणावरून गदारोळ झाला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना समोरून मंत्री गिरीश महाजन त्यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते. वारंवार मध्ये बोलल्यानंतर अंबादास दानवे भडकले आणि मध्ये मध्ये तोंड घालण्याची तुमची सवय बंद करा, अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांना खडसावले. यावेळी महाजन आणि दानवे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झडली.
समोरून महाजन आणि बाकड्यावरून अंबादास दानवे एकमेकांकडे हातवारे आणि इशारे करून बोलत होते. सभापती महोदय नियमानुसार मी बोलतो आहे, समोरच्या बाजूने चार चार लोक बोलत असताना आम्ही सगळ्यांचे ऐकून घेतले. मग आता मी बोलत असताना हे मध्ये का बोलतात? आम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तसे असेल तर मला सांगा मी बाहेर जाऊन बसतो त्याांनाच बोलू द्याअसे म्हणत अंबादास दानवे यांनी सभापतींकडे गिरीश महाजनांना समज देण्याची मागणी केली.
सभापती माझ्याकडे पाहून बोला असे म्हणत असताना गिरीश महाजन मात्र दानवे यांना पाहून मोठ्याने बोलत होते. तुम्हाला काय चौकशी करायची ती करा ना, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसता,एसआयटी नेमलेली आहे, सरकार तुमचे आहे मग करायची ती चौकशी करा, तुम्हाला कोणी रोखले आहे? असे म्हणत अंबादास दानवे यांनी महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला.माझ्या तोंडून चुकीचा शब्द गेला तर अवघड होऊन जाईल, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. दोन्ही बाजूने सभागृहात गोंधळ होण्याची परिस्थिती निर्माण झाली. गिरीश महाजन आणि अंबादास दानवे एकमेकांकडे पाहून हातवारे करत बोलत होते.अंदाज आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले.