मुंबई, 7 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील नागरिकांनी आज विधानभवनाबाहेर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) विरोधात जोरदार आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली. हातात फलक आणि बॅनर घेऊन आलेल्या आंदोलकांनी “बॅलेट पेपरच हवी”, “ईव्हीएम हटाव, लोकशाही वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थी करून त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमधील कथित छेडछाडीच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. “ईव्हीएममधील तांत्रिक त्रुटींवर निवडणूक आयोगाकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही,” असा आरोप आंदोलक करत आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा नागरिकांचा रोष आहे.
या पार्श्वभूमीवर १९ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत मारकडवाडी ते मुंबई शिवाजी पार्क असा लाँग मार्च आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज विधानभवनाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. “ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपर पुन्हा आणा,” ही प्रमुख मागणी आंदोलकांनी पुन्हा एकदा समोर ठेवली आहे.
राज्यभरात यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलक नागरिकांनी केली आहे.