सांगोला : प्रतिनिधी
समाज माध्यमांवर महापुरुषांचा अवमान करणारी पोस्ट टाकल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महूद व महिम येथे आज रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आले आहे.
समाज माध्यमांवर थोर महापुरुषांविषयी आक्षेपहार्य पोस्ट टाकल्याची घटना शनिवार(ता.२२) रोजी रात्री उशिरा चर्चेत आली. सांगोला पोलिसांना कळताच त्यांनी अशी आक्षेपहार्य पोस्ट टाकणाऱ्या युवकाला महिम येथून ताब्यात घेतले.महूद येथील मुख्य चौकात युवकांनी रात्री ११ ते १२ असा सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण दिवसभर महूद व महिम परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.सर्व दुकाने,व्यवहार शंभर टक्के बंद ठेवून नागरिकांनी यास पाठिंबा दिला. आजचा महूद व महिम बंद शांततेत पार पडला. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सायंकाळी उशिरा येथील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनास एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात ही आक्षेपहार्य पोस्ट करणाऱ्या युवकाच्या भावाने चार महिन्यांपूर्वी अशीच वादग्रस्त पोस्ट केली होती. तेव्हा त्याला ग्रामस्थांनी समज दिली होती. हे दोघेही भाऊ अशा प्रकारे वारंवार वादग्रस्त पोस्ट करत आहेत.व त्यांचे पालक अशा प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देत आहेत.त्यामुळे परिसरात धार्मिक तणाव निर्माण होतो आहे.तेव्हा या कुटुंबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे