छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ नोव्हेंबरनंतर होतील त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले.
मराठवाडा विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मराठवाडा विभागीय नियोजन आढावा बैठक पार पडली. भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीत ते बोलत होते.
राज्यात टण्याटप्याने प्रथम नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद व सर्वात शेवटी महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जातील. महायुतीत निवडणुका लढवायच्या असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. निवडणुकीत गण, गट अथवा वॉर्डनिहाय युती करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याची मुभा त्यांनी दिली आहे. सरसकट युतीत निवडणुका लढवल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, मतदारसंघनिहाय नियोजन तसेच संघटनात्मक बळकटी यावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजाताई मुंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. भागवत कराड, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मराठवाडा विभागातील आमदार, भाजपा परिवारातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.