अमरावती, 9 ऑगस्ट –
दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाच्या उत्पादनात यंदा कीड आणि हवामानातील बदलांमुळे घट झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर झाला आहे. अमरावतीत किरकोळ नारळाचा दर २५ रुपयांवरून ३५ ते ४० रुपये नग इतका पोहोचला आहे, तर मोठ्या ‘कोठारी’ नारळाची किंमत ६० ते ६५ रुपये झाली आहे.
तामिळनाडू आणि कर्नाटक येथून होणारी आवक लक्षणीय घटल्याने श्रावणापूर्वीच दरवाढ झाली आहे. गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर नारळाची मागणी वाढत असली तरी उपलब्धता कमी असल्याने दर दिवाळीपर्यंत उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. सणासुदीत साधारण ६० ते १०० टन आवक होते, परंतु यंदा ती तुलनेने कमी आहे.
कोकणात दररोज सुमारे ५०० पोती नारळ कोल्हापुरातून जातात. यापूर्वी घाऊक बाजारात नारळ ५ ते १५ रुपयांना मिळत होता, मात्र आता ५०० ग्रॅम वजनाच्या नारळाची किंमत किमान ३० रुपये झाली आहे. केवळ एका आठवड्यात प्रतिकिलो दरात सात रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.