एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची केली मागणी
मुंबई. 14 जुलै (हिं.स.) : राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या वादाला उधाण आले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरळी येथील भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी वरळी येथील “ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळावा” या कार्यक्रमात 5 जुलै रोजी दिलेल्या भाषणात भडकाऊ आणि द्वेषजन्य विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऍड. नित्यानंद शर्मा, ऍड. पंकज कुमार मिश्रा आणि ऍड. आशिष राय यांनी संयुक्तपणे ही लेखी तक्रार सादर केली असून, भाषणाच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, भाषणात राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः “अशा घटनांचे व्हिडिओ पुरावे म्हणून काढू नका” असे विधान करून त्यांनी गंभीर गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे विधान गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील आहे आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन करणारे आहे, असे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी विविध भागांत परप्रांतीय नागरिकांवर मराठी भाषा वापरण्यासाठी दबाव आणला. नकार दिल्यास त्यांना धमकावण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली आणि काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या.
अशा प्रकारच्या कारवायांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचेही उल्लंघन होत असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीनुसार राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषणप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या सर्व घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.”राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, 1980″ अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
सर्व भारतीय नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीचे उपाय योजावेत.प्रशासनाने घटनांना गांभीर्याने घेत राज्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील याची हमी द्यावी.राज्य शासनाने अशा विघटनकारी वक्तव्यांचा सार्वजनिक निषेध करावा अशी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर अद्याप मनसे किंवा राज ठाकरे यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.