नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.) : भारतीय रेल्वेच्या प्रत्येक प्रवाशाला आगामी 2030 अखेर कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. यासाठी रेल्वे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे. यामध्ये कोचनिर्मितीपासून ते नवीन मार्गांचा विस्तार यांचा समावेश आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या 4-5 वर्षांत 500 हून अधिक रेल्वे कोच तयार केले जातील. तर 2030 पर्यंत 40 हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग टाकण्याच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क विस्तार असेल. यातंर्गत, 434 उपप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यावर सुमारे 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या विस्तारामुळे गाड्यांची संख्या वाढेल, ज्यामुळे प्रमुख मार्गांवरील भार कमी होईल आणि तिकिटांच्या वेटिंगची समस्या हळूहळू संपेल.
आगामी 5 वर्षांत 500 हून अधिक नवीन कोच तयार करणार आहे. हे डबे केवळ संख्येने जास्त नसून, तांत्रिकद़ृष्ट्या प्रगत आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असतील. याशिवाय, रेल्वेने 8 हजार ट्रेन सेट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ज्यावर एक लाख कोटी रुपये खर्च केले जातील. रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (चेन्नई), मॉडर्न कोच फॅक्टरी (रायबरेली) आणि रेल कोच फॅक्टरी (कपूरथळा) या तीन प्रमुख कोच उत्पादन कारखान्यांमध्ये उत्पादन क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.त्याचप्रमाणे 2030 पर्यंत 200 वंदे भारत आणि एक हजार अमृत भारत गाड्या चालवण्याची रेल्वेची योजना आहे. या गाड्या केवळ हाय-स्पीड नसतील, तर त्यात जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील. वंदे भारत गाड्या आधीच अनेक मार्गांवर प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देत आहेत. अमृत भारत गाड्या प्रामुख्याने पारंपरिक लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांची जागा घेतील.
भारतीय रेल्वे सध्या दरवर्षी 800 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि 2030 पर्यंत हा आकडा एक हजार कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, रेल्वे तीन हजार अतिरिक्त गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. यामुळे अधिक प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.