सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)। ऊस उत्पादकांच्या उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम वारंवार नोटीस बजावूनही जमा न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे संबंधित साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहे.
तथापि, दुसरीकडे नोटीस हा केवळ देखावा असून, खरोखरच शासनाने ठरविले असेल, तर ही कारवाई तत्काळ करून शेतकऱ्यांना थकीत रकमा मिळवून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन आणि सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा सरलेल्या गाळप हंगामात ३३ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला होता. गाळप झालेल्या उसाचे देयक १४ दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु गाळप हंगाम संपला, तरी दोन महिन्यांपासून बऱ्याच साखर कारखान्यांनी उसाची देयके अद्यापि जमा केली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.