अमरावती, २ सप्टेंबर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात बांग्लादेशी व पाकिस्तानी नागरिकांना फर्जी जन्म-मृत्यू दाखले देण्यात आल्याचा गंभीर आरोप महसूल प्रशासनावर केला होता. मात्र, शासनाच्या चौकशी अहवालानुसार या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे जिल्ह्याची नाहक बदनामी झाली व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, असा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, ग्रामीण अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, विरेंद्र जगताप, विलास इंगोले यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी काँग्रेसने सांगितले की, सोमय्यांनी अंजनगाव सोनोरी व अन्य तालुक्यांमध्ये बांग्लादेशी नागरिकांना जाणीवपूर्वक दाखले दिले जात असल्याचा आरोप करत संपूर्ण जिल्ह्यात तपासणीसाठी महसूल प्रशासनावर दबाव टाकला. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना दाखले वेळेवर मिळाले नाहीत आणि त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. चौकशी समितीने १४ तहसीलदार व ५ नायब तहसीलदारांना नोटीस दिल्यानंतर सर्व स्तरावर पडताळणी करण्यात आली. चौकशी अहवालात कुठेही विदेशी नागरिकांना दाखले देण्यात आले असल्याचे आढळले नाही, हे शासनाकडून लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात आले आहे.
खासदार बळवंत वानखडे यांनी ९ जून रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर ४ जुलै व १५ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना पूर्ववत दाखले देण्याचे आदेश दिले.
काँग्रेसने सोमय्यांवर राजकीय स्टंट करत अमरावती जिल्ह्याचा बदनामी करून विद्यार्थ्यांचे व सामान्य नागरिकांचे नुकसान केल्याचा आरोप केला असून, जिल्हा प्रशासनावर वारंवार दबाव टाकणाऱ्या सोमय्यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले, “मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांचे हे आजोळ अमरावती शहर आहे. या आजोळाचे ते लेबोरेटरी करत असतील तर कसे चालणार? जर अमरावतीला प्रयोगशाळेसारखं वापरून काही प्रयोग चालू असतील तर ते योग्य नाही. उट-सूट कधीही, हा माणूस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शहराचे वातावरण खराब करतो. कुठेही जाऊन वातावरण बिघडवतो. हे निंदनीय आहे, हे कृत्य खरोखरच निषेधार्ह आहे.”