नवी दिल्ली, 26 जुलै – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागासवर्गीय समाजाची माफी मागून त्यांच्या मुद्द्यांवर काम कमी झाल्याचे कबूल केले असले तरी, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने ओबीसी समाजासाठी जेवढं करायला हवं होतं, ते केलं नाही, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेला “स्वार्थी राजकारण” म्हणत फटकारलं.
मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “देशातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे. हे आता राहुल गांधींनी स्वतः मान्य केले आहे. ही काही नवी गोष्ट नाही, उलट हे दुटप्पी राजकारण आहे – एक मनात आणि दुसरं जिभेवर.”
काँग्रेसवर जुन्या पापांची आठवण
मायावती म्हणाल्या की, काँग्रेसने केवळ ओबीसी नव्हे, तर अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गांबाबतही वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं आहे. “काँग्रेसच्या या दुष्परिणामांमुळेच आम्हाला बसपा सारखा पक्ष स्थापन करावा लागला,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मगरीचे अश्रू आणि राजकीय संधीसाधूपणा
मायावतींच्या मते, काँग्रेस सत्ता गेल्यानंतर आता या वर्गांची आठवण काढत आहे. “ही केवळ मगरीचे अश्रू ढाळण्यासारखी कृती आहे. त्यांच्या हेतूंमध्ये आणि धोरणांमध्ये नेहमीच दोष राहिलेला आहे,” असं त्यांनी लिहिलं.
त्याचबरोबर, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएवरही त्यांनी टीका केली. “सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपही ओबीसी वर्गाबाबत काँग्रेसप्रमाणेच दुटप्पी भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
आरक्षण धोरणांवर सर्वच पक्ष अपयशी – बसपाचे समर्थन
मायावती यांनी म्हटले की, सर्व प्रमुख जातीय पक्षांनी मिळून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण प्रभावहीन बनवले आहे. त्यामुळे हे समाजगट आजही सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दुबळे राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, बसपा पक्षच या समाजाचा खरा हितचिंतक असल्याचा दावा त्यांनी केला.
“फसवणुकीपासून सावध राहा” – मायावतींचे आवाहन
शेवटी मायावती यांनी स्पष्ट शब्दांत आवाहन केलं की, “देशातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा) किंवा इतर विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यांच्या हितासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने फक्त बसपाच योग्य पर्याय आहे.”
