सोलापूर, 26 मे, (हिं.स.)। व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. नेते गेल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवून नव्या सक्षम नेतृत्वाच्या उभारणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची काँग्रेस भवनात बैठक घेण्यात आली. शहर उत्तर, दक्षिणनंतर आता अक्कलकोटमधील नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर भविष्यात पक्षाची होणारी पडझड थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ही बैठक झाली.
माजी मंत्री म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आम्ही काँग्रेससोबत आहोत, असे सांगणारे आपल्याला अनेक फोन आले. अजूनही ७० टक्के मतदार काँग्रेससोबत आहे. अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. मी कायम सोबत आहे, असे आश्वासनही खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला.