छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै :
मराठवाड्यात भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर हे दोघे मंगळवारी (29 जुलै) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोघांचा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. गोरंट्याल हे तीन वेळा आमदार राहिले असून वरपूडकर हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेतृत्व मानले जाते. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असून हा प्रवेश त्याचाच भाग मानला जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या अंदाजांनुसार, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून आणखी नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घडामोडींमुळे जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या या डावामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.