मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संतप्त कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला चढवत कार्यालयाच्या काचाफोडल्या . या प्रकरणानंतर सुशील केडिया यांनी अखेर सोशल मीडियावर (एक्स) पोस्ट करत राज ठाकरे यांची आणि मराठी जनतेची माफी मागितली आहे.
केडिया यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले, “माझं ट्वीट चुकीच्या प्रकारे समजलं गेलं. माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. राज ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. मराठी प्रभावी बोलता येत नसल्यामुळे मी ती वापरत नाही, मात्र मी माझी चूक मान्य करतो.”
याआधी केडिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, “आय डोन्ट लव्ह मराठी, आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल” आणि त्यात राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप उसळला आणि प्रत्यक्ष कृतीतून मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर नारळ फेकून काचफोडली.
या घटनेनंतर मनसेचे नेते सचिन गोळे यांनी स्पष्ट इशारा दिला, “आज ऑफिस फोडलं, उद्या घरी जायलाही मागेपुढे पाहणार नाही. सुशील केडिया गेली ३० वर्षं मुंबईत राहतो, पैसे कमावतो, पण मराठी शिकत नाही, हा मराठी अस्मितेचा अपमान आहे.”सुशील केडिया हे शेअर बाजार विश्लेषक आणि गुंतवणूकदार असून, त्यांच्या मराठीविरोधी वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय ठरला आहे.