सोलापूर : अकलूज येथील पोलीस वसाहत तसेच मसूदमळा परिसरात सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकून रोख रकमेसह ५ लाखाचे दागिने लुटून नेले. ही घटना काल सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या मारहाणीत अकलूज पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल बापूसाहेब मिरगणे (वय३६) हे जखमी झाले. हवालदार मिरगणे हे बंदोबस्तासाठी बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातच दरोडा टाकला.
अकलूज येथील वसंत विहार पोलीस वसाहत येथे अमोल मिरगणे हे हेडकॉन्स्टेबल रूम नंबर ५५ येथे राहण्यास आहेत. त्यांच्या घरातील मंडळी गौरीच्या सणानिमित्त गावाला गेले होते. त्यामुळे ते घराला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते. ड्युटी आटोपून ते पहाटे ३ वाजेच्या सुमारास ते घरी परतले होते. त्यावेळी त्यांचे घर उघडे दिसले, आणि आत ४ अनोळखी इसम उचकाउचकी करीत होते. त्यांनी विचारणा केली असता दरोडेखोरांनी त्यांना कोयता, कटावणी आणि दगडाने मारहाण करून किरकोळ जखमी केले.
त्यांच्या कपाटातील ३० हजार रुपये रोख आणि ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९० हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. या घटनेची फिर्याद अमोल मिरगणे यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच सुमारास मसूद मळा परिसरात राहणारे लालसाहेब निवृत्ती मोरे यांच्या घरावर देखील चोरट्यांनी दरोडा टाकून एक लाखाची रोकड लुटून नेली. मोरे हे घरात झोपले होते. त्यावेळेस चौघां दरोडेखोरांनी लोखंडी गेट तोडून हॉलमध्ये प्रवेश केला. त्यांना सत्तूरने मारण्याची धमकी देऊन, १ लाखाची रोकड लुटून पोबारा केला. याची नोंद देखील अकलूज पोलिसात झाली. पोलीस निरीक्षक सुगावकर आणि फौजदार जगताप हे पुढील तपास करीत आहेत.
* कोंडी ब्रिज येथे अपघात, दुचाकी चालक ठार
सोलापूर : पुणे महामार्गावरील कोंडी येथील ब्रिजवर वेगाने जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने अतुल नागनाथ माने ( वय २९ राहणार शिंगोली, तालुका मोहोळ) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. ते दुचाकीवरून पुणे ते सोलापूर असा प्रवास करीत होते. कोंडी ब्रिजजवळ पहाटे हा अपघात घडला. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. अशी प्राथमिक माहिती तालुका पोलिसात झाली आहे .