माले, 24 जुलै — पंतप्रधान नरेंद्र मोदी २५-२६ जुलै रोजी मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार असताना, त्याआधीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांचे मेहुणे आणि सलाफी जमियतचे नेते शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदींवर धर्मविरोधी आरोप करत त्यांना ‘दहशतवादी’ म्हणवले आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, नंतर हटवली
शेख अब्दुल्ला यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले होते की, “मोदी इस्लामचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यांनी बाबरी मशीद पाडली, मुस्लिमांची जमीन लुटली आणि अहमदाबादचे कब्रस्तानात रूपांतर केले. त्यांना मालदीवमध्ये येऊ देणे ही मोठी चूक आहे.”
वाद पेटल्यानंतर त्यांनी ही पोस्ट तात्काळ डिलीट केली. मात्र, सोशल मीडियावर यासंबंधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
सरकारकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या प्रकरणावर मालदीव सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शेख अब्दुल्ला हे राष्ट्रपतींच्या पत्नी साजिदा मोहम्मद यांनी स्थापन केलेल्या एका सलाफी संघटनेचे सदस्य आहेत.
पंतप्रधान मोदींचा दौरा आणि द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान मोदी २५ जुलै रोजी मालदीवमध्ये दाखल होतील, आणि २६ जुलै रोजी स्वातंत्र्यदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. या दौऱ्यात द्विपक्षीय चर्चा, व्यापार, सागरी सुरक्षा आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
मोदींचा हा तिसरा मालदीव दौरा असून, ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या चर्चेनंतर मुक्त व्यापार करार (FTA) वर दोन्ही देश काम करत आहेत.