भोपाळ : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जगभरात लस शोधली जात असताना नेत्यांकडून मात्र मांडण्यात येणारे तर्कवितर्क लोकांना गोंधळात टाकत आहेत. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव यात आता जोडले गेले आहे. त्यांनी कोरोना आजाराला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले आहे. यात प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, देशात कोरोनाला संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक अध्यात्मिक प्रयत्न करुयात.
प्रज्ञासिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी अध्यात्मिक प्रयत्न करु. येत्या पाच ऑगस्टपर्यंत आपल्या घरी दररोज सायंकाळी सात वाजता पाच वेळेस हनुमान चालिसाचे पठण करावे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
पाच ऑगस्टला सायंकाळी घरात दिवे लावावेत आणि श्रीरामाची आरती करुन अनुष्ठानाची समाप्ती करावी. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. त्यात म्हटले की, मध्य प्रदेशचे सरकार कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून भोपाळमध्ये चार ऑगस्टपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
चार तारखेला लॉकडाउन संपेल. पाच ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होईल आणि तो दिवस दिवाळीप्रमाणे साजरा होईल. जेव्हा देशात एकाच आवाजात हनुमान चालीसाचे पठण होईल तेव्हा तो आवाज नक्कीच प्रभावी ठरेल आणि आपल्याला कोरोनापासून मुक्ती मिळेल. प्रज्ञासिंह यांच्या या आवाहनाची सध्या चर्चा होत आहे. यापूर्वीही मध्य प्रदेशचे प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी अयोध्येत राम मंदिराच्या कामास सुरवात झाल्यानंतर कोरोना कमी होईल, असे वक्तव्य केले होते.
* केंद्रीय राज्यमंञी यांचे अजब तर्कवितर्क
– मागील आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात पापडाचं पॅकेट पकडलं होतं. हे पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा मेघवाल यांनी केला होता.