पुणे, 7 जुलै (हिं.स.)।
राज्यात जमिनींच्या पोटहिश्श्यांचे सातबारा उतारा आणि मोजणी नकाशे यांचा ताळमेळ लागत नाही. त्यांचा ताळमेळ लावून अभिलेख अद्ययावत करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १८ तालुक्यांतील सुमारे चार लाख ७७ हजार ७८४ सर्व्हे क्रमांकांची मोजणी करण्यात येणार असून, त्याचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येणार आहे.
पोटहिस्सा मोजणीच्या कार्यपद्धतीसाठी प्रारूप नियमावली केली आहे. प्रत्यक्षात मोजणीनंतर त्याच्या नोंदी कशा घ्याव्यात, त्यात काही तांत्रिक अडथळे येतात. ते कसे दूर करावेत, तसेच या मोजणीसाठी किती मनुष्यबळ लागणार आहे, याचा अभ्यास करून अंतिम कार्यपद्धती निश्चित करून राज्यात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात स्वामित्व योजनेच्या धर्तीवर एका सर्व्हे क्रमांकातील जेवढे खातेदार असतील, त्यानुसार त्यांच्या पोटहिश्श्याची मोजणी करून नकाशे तयार केले जातील. त्यामुळे जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पलूस (जि.सांगली), गडहिंग्लज (कोल्हापूर), अक्कलकोट (सोलापूर), या तीन तालुक्यांत पोटहिश्श्यांची मोजणी होणार आहे.