नवी दिल्ली, 18 ऑगस्ट – एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर १७ ऑगस्ट रोजी राधाकृष्णन यांची एनडीए उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घकालीन जनसेवा व विविध क्षेत्रातील अनुभव देशाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मोदींनी लिहिले की, राधाकृष्णन यांनी समाजातील वंचित व उपेक्षित घटकांच्या सशक्तीकरणावर नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या समर्पण, विनम्रता आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये स्थानिक पातळीवर केलेल्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आशा व्यक्त केली की, विरोधी पक्ष देखील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. त्यांनी सांगितले की, पुढील उपराष्ट्रपतींची निवड एकमताने व्हावी यासाठी विरोधी पक्ष नेत्यांशी संपर्क साधला जात आहे.