अमरावती, 24 मे (हिं.स.)।
एका माथेफिरू आरोपीने प्रेयसीचे लग्न ठरलेल्या मुलाला लग्नाच्या दोन दिवस आधी भेटायला बोलविले आणि दगडाचे ठेचून त्याची हत्या केली. एवढेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला. तर दुसरीकडे लग्नाची लगबग सुरू असताना मुलगा दोन दिवस आधी बेपत्ता झाल्याने घरातील सदस्य त्याचा शोध घेत होते.
ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा मृतदेह मिळाल्याने वराती ऐवजी त्याची अत्यंयात्रा निघाली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून याबाबत पोलिसांनी मारेकरी आरोपीला अटक केली आहे. धरमू मयतीलाल उईके (२४, रा. पाटनाका, मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा विवाह २३ मे रोजी विवाह ठरला होता. धरमूची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपी दयाराम गंजीलाल वरठी (३४, रा. वलनी, ता मुलताई, जिल्हा बैतूल) याला अवघ्या दोन ते तीन तासांत अटक केली. धरमूचे लग्न मध्यप्रदेश येथील एका मुलीशी ठरले होते व शुक्रवार २३ मे २०२५ रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता.
दरम्यान धरमू दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार काल २२ मे रोजी त्याचे वडील मयतीलाल उईके यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने मोर्शी पोलिसांनी तपास सुरू केला होता. आज शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातील विहिरी जवळ रखवालदाराला रक्त दिसून आल्यामुळे त्याने विहिरीत बघितले असता त्याला एक मृतदेह आढळून आला. ही माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत तरुणाचे प्रेत विहिरीबाहेर विहिरीबाहेर काढले. त्याची ओळख लगेच पटली. धरमूच्या डोक्यावर व गालावर जखमा व त्या ठिकाणी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. लगेच घटनास्थळी अमरावती येथील श्वान पथक व ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक धरमू उईके याचे 23 जून 2025 रोजी गावातील मुली सोबत लग्न होणार होते. परंतु त्याच्याहोणाऱ्या पत्नीसोबत आरोपी दयाराम वरठी याचे प्रेम संबंध होते म्हणून लग्नाच्या आधल्या दिवशी धरमु उईके याचा काटा काढण्याच्या उद्देशाने दयारामने ग्राम पाळा तालुका मोर्शी येथून मोर्शीला लग्ना करिता फटाके आणण्याच्या बहाण्याने मृतकाला मोर्शी येथे मोटर सायकलने आणले.
त्यानंतर धरमूला आरोपी दयाराम वरठी यांनी दारू पाजली व मौजा कवठा शिवारात रमेश ठाकरे यांच्या शेतात आणले. तेथे टिनाच्या झोपडीत मृतकाच्या डोक्यावर दगड मारून त्याचेदगडाने डोके ठेचून हत्या केली आणि मृतदेह जवळच असलेल्या रमेश ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत फेकला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत, पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख करीत आहेत. सदर घटनेचा तपास मोर्शी पोलीस आणि शिरखेड ठाणेदार सचिन लुले यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून सदर हत्तेच्या आरोपीला दहा तासाच्या आत अटक करण्यात आले असून सदर घटने संदर्भात शिरखेड पोलिसांनी अपराध क्रमांक 213 कलम 103/1 हत्तेचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मोर्शी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात शिरखेड ठाणेदार सचिन लुले, सहाय्यक ठाणेदार लक्ष्मण तजे, जमादार संतोष लहाने, पोलीस कॉन्स्टेबल रोशन तथे, पंकज चौधरी, वैभव घोगरे हे करीत आहे.