उधमपूर, ७ ऑगस्ट –
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील कडवा-बसंतगड मार्गावर सीआरपीएफच्या जवानांनी भरलेली बस २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तीन जवान शहीद झाले असून १५ जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही बस केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १८७ व्या बटालियनची असून ती कडवा येथून बसंतगडकडे जात होती. आज सकाळी सुमारे १०:३० वाजता बस दरीत कोसळली. बसमध्ये एकूण १८ जवान होते. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मदत आणि बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून स्थानिक नागरिकांनीही स्वेच्छेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सर्व जखमींना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उधमपूरमधील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेबाबत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांनी सांगितले की, “उधमपूरमधील कडवा-बसंतगड परिसरात सीआरपीएफच्या वाहनाला झालेल्या अपघाताची माहिती मिळताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवले जात असून शक्य ती सर्व मदत दिली जात आहे.”